दिनमान प्रतिनिधी
कल्याण ।
खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत कल्याण शहरातील सुभाष मैदानात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी 14 कोटी 50 लाख रुपये मंजूर करावेत, अशी मागणी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्याकडे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन ठाकुर यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर सुभाष मैदानातील भव्य क्रीडा संकुलाचे पहिले पाऊल पडले असल्याचे मानले जात आहे.
कल्याण पश्चिममधील ऐतिहासिक सुभाष या मैदानातील मातीतून अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. सुभाष मैदानात भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील प्रयत्नशील आहेत. या भव्य संकुलासाठी 24 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी कपिल पाटील यांनी खासदार निधी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचे ठरविले आहे.
केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या निधीमधून नियोजित भव्य क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलसाठी प्रशस्त हॉल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 11 कोटी 83 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
हॉकीसाठी प्रकाशयोजना असलेले नैसर्गिक मैदान 2 कोटी 63 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. खासदार निधी व कल्याण महापालिकेच्या माध्यमातून अद्ययावत जॉगिंग ट्रॅक, संरक्षक भिंत, पार्किंग आणि इतर क्रीडा सुविधा उभारल्या जाणार आहेत.