दिनमान प्रतिनिधी
मुंबई|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. २५) दुपारी दोन वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर बारावीच्या परीक्षेत विषयनिहाय संपादित केलेले गुण पाहता येतील. गुणपत्रिकेच्या माहितीची प्रिंटआऊटही घेता येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी २६ मेपासून संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ५ जूनपर्यंत गुणपडताळणीसाठीचे अर्ज स्वीकारले जातील. छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत १४ जूनपर्यंत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. विद्यार्थ्यांना ५ जूनपासून गुणपत्रिका महाविद्यालयातून घेता येणार आहे.
मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा वेळेपूर्वीच जाहीर केला आहे. परीक्षा आणि त्यादरम्यान जुन्या पेन्शन योजनेचे आंदोलन, उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार इत्यादी कारणांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला होता. मात्र, मंडळाने विविध प्रकारची यंत्रणा राबवून निकाल वेळेत जाहीर करण्याची घोषणा केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
येथे पाहता येईल निकाल
mahresult.nic.in, http://hsc.mahresult.org.in,
http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in