दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
महापालिका परिवहन सेवेच्या कंत्राटी वाहकांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवार पहाटेपासून पुकारलेला संप शनिवारी दिवसभर कायम होता. सलग दुसर्या दिवशी सुरू असलेल्या संपामुळे तीनशेपैकी शंभर बसगाड्या प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होऊ शकल्या नसून, यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तसेच या संपामुळे शुक्रवारी दिवसभरात परिवहन सेवेचे १२ लाखांचे उत्पन्न बुडाले. ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) माध्यमातून महापालिका ठाणेकरांना अंतर्गत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देते.
परिवहन सेवेच्या सुमारे ३०० बसगाड्या प्रवाशांसाठी दररोज उपलब्ध होतात. परंतु शहरातील प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी आहे. त्यातच कंत्राटी वाहकांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे जेमतेम २०० बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. टीएमटीमध्ये कंत्राटी पद्धतीने वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोख वेतन मिळावे, महापालिकेने ठरवलेले वेतन मिळावे, थकबाकी मिळावी या मागण्यांसाठी शुक्रवारी पहाटेपासून टीएमटी वाहकांनी संप पुकारला आहे. शनिवारीही संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शनिवार अनेक जण घराबाहेर पडले होते. त्यांना या संपाचा फटका बसला.
या संपामुळे दोन दिवसांत परिवहनचे १२ लाखांचे नुकसान झाले आहे. संपावर गेलेल्या कर्मचार्यांच्या खात्यात त्यांनी मागण्या केलेल्यांमधील काही रकम जमा झाली आहे.
– भालचंद्र बेहरे, व्यवस्थापक, टीएमटी